एका संध्याकाळी घरातून मनू गायब होते तेव्हा..
परवाचीच गोष्ट. आमची मनू (मांजर) रोज दुपारभर मस्त ताणून देते. सोफ्याखाली तिची एक ठरलेली जागा आहे. सोफ्याच्या उशा उचलल्याखेरीज काही ती दिसत नाही. कधीतरी संध्याकाळी 6 च्या नंतर त्या जाग्या होऊन आळोखे पिळोखे देत बाहेर येतात.
परवा 7 वाजले तरी हिची काही चाहूल नाही. सोफ्याच्या उशा उचलून बघितल्या तर तिथे ती नव्हतीच. मग घरभर शोध. तासभर शोधूनही सापडेना … म्हटलं गेली तरी कुठे …
हे पिल्लू घरातच जन्माला आलेलं आणि जेमतेम तीन महिन्याची असताना आमच्याकडे आलेलं. आधीची आमची माऊ अचानक तडकाफडकी मरण पावल्याने मुलगा त्या बाबतीत हळवा. हिला आजिबात घराबाहेर सोडत नव्हतो आणि घरातच रहायची सवय असल्याने हिला पण बाहेर जायची सवय नाही. शिवाय सोसायटीतल्या प्राणिप्रेमी लोकांच्या कृपेने दोन भटकी कुत्री आमच्याच बिल्डिंगमध्ये कायमची वास्तव्याला आहेत.
चुकून खाली गेली असावी आणि आता घरी यायचा रस्ता सापडत नसावा या निष्कर्षाला आम्ही आलो. घर, गच्ची, पार्किंग, समोरची बिल्डिंग सगळं सगळं परत परत शोधून झालं.
शेवटी दहा वाजून गेले तशी काळजी वाटू लागली. नुकतीच Sharmila Apte ची पोस्ट वाचण्यात आली होती. तिला फोन केला. तिने सांगितलं की ‘माऊ सेफ आहे. पार्किंगमध्ये कारखाली आहे.’ आम्ही दोघे परत खाली. सोसायटीतल्या एकूण एक कार्सखाली टॉर्च मारून मारून शोधलं. अर्धा तास शोध घेऊन परत आलो.
पहाटे 3 च्या सुमारास मुलाचं ऑफिसचं काम संपून तो झोपायला गेला. तिच्या काळजीने त्याला झोप काही येईना.
पहाटे 5 ला असाच ‘कुठे असेल ती’ याचा विचार करत तो खिडकीतून खाली बघत होता आणि अचानक एका स्कूटरवर तिचं पांढरं शुभ्र डोकं चमकलं. हा तसाच धावत खाली गेला. मांजरांना माणसांची ओळख लगेच पटत नाही बहुधा. आधी लांब पळत होती. पण मानगूट धरून जवळ घेतल्यावर मग ओळख पटली मॅडमना.
एका मांजराला शोधायला मी इतका उद्योग करेन यावर माझा स्वतःचा पण आयुष्यात कधी विश्वास बसला नसता.
पण शेवट गोड झाला गं बाई ….
थँक्स शर्मिला ❤️❤️❤️❤️
स्वाती जोशी