हरवलेल्या ढोलूची घर वापसी
ढोलू यापूर्वी काहीवेळा घराबाहेर पडून हरवला आहे, सापडला आहे. सगळीच मांजरं हे उद्योग कधी न कधी करतात आणि आपला हृदयाचा ठोका चुकवतातच. यावेळी वेगळं आव्हान हे होतं की आमच्या सोसायटीत न हरवता आईच्या सोसायटीत तो हरवला. त्याला ती जागा परिचित नाही, त्यामुळे घर शोधून परत येणं कितपत शक्य होतं याबद्दल शंका आहे. आम्ही चौघं बाहेरगावी गेलो की ढोलूला आईकडे सोडून जातो, हे असं गेली साडेचार वर्ष चालू आहे….
२१ मार्चला दुपारी आईला फोन करून मी सांगितलं की आत्ता मी बाहेर जातेय, पण रात्री येऊन आम्ही ढोलूला घेऊन जाऊ. तर ती म्हणाली की कालपासून ढोलू हरवला आहे. कसा घराबाहेर गेला नजर चुकवून कळलंच नाही.
मी इतकी चिंतेत होते… आधीच म्हणाली असती तर सकाळीच जाऊन शोधलं असतं. आता वेळही नव्हता … तरी कार्यक्रमाला उशिरा जावं असं ठरवून मी तिच्याकडे जायला निघणार, तेवढ्यात शेजारी राहणाऱ्या मावशींचा फोन आला… की आईला बरं वाटत नाहिये, हॉस्पिटलमध्ये न्यायला हवं. मी म्हटलं तुम्ही ambulance बोलवा, मी पोचते 15 मिनिटांत… ढोलूला शोधणं शक्य नव्हतं … आईला admit करणं ही priority होती. त्या रात्री आईबरोबर मी हॉस्पिटलमध्ये होते … हळूहळू सुधारणा होत होती …
दुसऱ्या दिवशी कामाची मुलगी हॉस्पिटलमध्ये आल्यावर, इतर गोष्टी मार्गी लावून मी पुन्हा आईच्या सोसायटीत गेले. ओजस पण आला. आम्ही ढोलूला हाका मारत शोधलं तासभर, watchmans, कचरा साफ करणारे, छोटी मुलं … सगळ्यांना फोटो दाखवला. मांजर मिळालं तर कळवा सांगितलं. कोणीतरी त्याच भागात त्याला काल पाहिलं होतं, पण हाक मारून ते येत नव्हतं… त्याला लपून बसायला आवडतं, त्यामुळे सामानामागे, खाचा खोचांमध्ये सगळीकडे बघून झालं … नाही सापडलं.
पुढच्या दिवशी हॉस्पिटलच्या वाऱ्या झाल्या… आईची तब्येत सुधारतेय असं दिसलं… पण घरी इतक्यात नाही नेऊ शकणार हे कळलं … ढोलू घर शोधून परत गेलं तरी घर बंदच असणार होतं. शेजारच्या काकांनी सोसायटीच्या ग्रुपवर फोटो वगैरे शेअर केला…. सगळेच लक्ष ठेवून होते.
आम्ही चौघं रात्री 10 वाजता ठरवलं की आत्ता जाऊन ढोलूला शोधूया… शांतताही असेल, आणि भुकेची वेळही होऊन गेलीय… जाऊन सगळी सोसायटीभर हाका मारत हिंडलो… पण नाहीच आलं ढोलू…
तुहिनला तर रोज रडू येत होतं त्याच्या आठवणीने … मलाही आठवण येत होती, पण हॉस्पिटलच्या जबाबदारीत विसरायला होत होतं. ओजस, श्रेयस, शोभा सगळेच अस्वस्थ. मांजर अचानक नाहीसं होणं हा एक इंद्रीय अनुभव असतो … त्याचा आवाज, स्पर्श, गंध सगळं आठवत राहतं … त्याला काय झालं असेल याच्या शक्यता बोलत होतो … पळून गेलं असेल का? त्याला आपण नको असू का? असंही मनात येऊन गेलं…
रात्री फायनली सोशल मीडियावर ढोलू हरवल्याची पोस्ट टाकली… अनेकांनी मदतीचा हात पुढे केला… त्यात 4-5 जणांनी animal communicator चा उल्लेख केला. मला हे माहित नव्हतं, नवीन होतं… समजून घ्यायला, प्रयत्न करायला काय हरकत आहे? असा विचार करून दुसऱ्या दिवशी अपर्णाताई डोळे यांनी दिलेल्या शर्मिला आपटे यांच्या नंबरवर मेसेज केला. त्यांनी फोटो, वय, वर्णन असे काही बारकावे समजून घेतले. त्या म्हणाल्या, मी बोलते आणि कळवते तुम्हाला… मला अनेक प्रश्न होते … ढोलूशी त्या कशा बोलणार? शब्द वापरणार की इतर काही? सगळंच अनाकलनीय होतं… पण अनेक गोष्टी आपल्याला न कळणाऱ्या घडत असतात हेही आहेच… मी हॉस्पिटलमध्ये गेले… त्या मेसेज करणार होत्या.
तिथे आईची फ़िजिओथेरपी चालू होती तर शेजारच्या मावशींचा फोन आला. तिथे फोनवर बोलायला परवानगी नसते, म्हणून मी घेतला नाही. सलग तिसऱ्यांदा केला तेव्हा, मी परत करते असं सांगायला फोन उचलला… तर त्या म्हणाल्या ढोलू मिल गया है| आप जल्दी आजाओ|
मी पटकन बाहेर गेले बोलायला … तर नेहा म्हणजे कामाच्या मुलीने ढोलूला बघितलं, पाठलाग केला, पण ते पळून गेलं… मी म्हटलं मी येते थोड्या वेळात किंवा ओजसला पाठवते… मी whatsapp तपासलं तर शर्मिला आपटे यांचा 20 मिनिटांपूर्वी मेसेज होता की,
“ढोलू तिथेच झाडा झुडपांमध्ये लपलं आहे, त्याचं पोट बरं नव्हतं म्हणून healing साठी बाहेर पडलं. त्याला घरी यायचं आहे.” ते कुठे आहे याच्या वर्णनात कंपाउंड wall चं वर्णन अचूक होतं… मी थक्क झाले!!… हा काय योगायोग आहे की खरंच त्या बोलल्यामुळे ढोलू बाहेर आलं आणि नेहाला दिसलं? आम्ही इतके वेळा तिथेच शोधलं तेव्हा नाही आलं, पण animal communicator च्या संवादानंतर ते बाहेर आलं?… माझा तर योगायोगांवर सुद्धा विश्वास नाहिये … rational माणसांना spiritual गोष्टींची भीती वाटते … त्यांची बॉर्डरलाईन अनेकदा धूसर झालेली असल्याने, आपण काहीतरी अंधश्रद्धेवर तर नाही न विश्वास ठेवत आहोत, अशी शंका येते … काहीतरी जादू असेल असं वाटत राहिलं… नाहीतर पाच दिवसांत कितीतरी लांब मांजर जाऊ शकलं असतं, ते काहीच respond करत नसल्याने तिथे आहे तरी का इथपासून शंका होती… ती आता मिटली. नेहाला दिसलेलं मांजर कशावरून ढोलूच असेल? असाही प्रश्न मनात होताच. पण मग या दोन गोष्टी जुळताहेत, आणि ढोलूला घरी यायचं आहे हे समजल्यावर डोळे झरायला लागले. शर्मिला आपट्यांनी ढोलूशी संवाद केल्या केल्या लगेचच नेहाला ते दिसलं हेही कमालीचं वाटलं…
आईची फ़िजिओथेरपी झाली होती, तिला खोलीत सोडलं, ब्यूरोच्या मावशी होत्याच … मी निघाले… 10 मिनिटांत पोहोचले. शेजारच्या दिशाला म्हटलं त्याचा खाऊ एका वाटीत घेऊन येतेस का? शोधूया इथे… animal communicator बद्दल तिला नाही सांगितलं, पण ज्या भागात ढोलू असल्याचं कळलं तिथे त्याला शंभरेक हाका मारल्या असतील… ते नाहीच आलं .. बरोबर सोसायटीतल्या दोन छोट्या मुली पण आल्या… त्या म्हणाल्या काकू तुमचा एकटीचा आवाज येऊ दे, तरच ते ओळखेल, आम्ही शांत बसतो…
आणि एका विशिष्ट ठिकाणी लांबून क्षीण आवाज आला … त्या दिशेने मी गेले … आम्ही एकमेकांचा आवाज ओळखला … एकदा मी एकदा ढोलू असं बोलत एका गाडीच्या खालून आवाज येतोय हे कळलं… वाकून बघितलं तर दिसेना …. SUV च्या खाली एका रिकाम्या जागेत चढून ढोलू बसला होता … 5 दिवस गायब असल्याने आवाज अजूनच बारीक झाला होता, पण एकमेकांना बघून आम्हाला बरं वाटलं… कसं काढायचं त्याला विचार करत mechanics जसे पाठीवर झोपून सरपटत गाडीखाली जातात तशी गेले, ढोलूचा पुढचा पाय पकडून त्याला खेचलं … ते परत पळून जायला बघत होतं, घट्ट धरून ठेवलं आणि मी पण बाहेर आले कशीबशी … तिथेच बसून त्याला घट्ट मिठी मारली, मुके घेतले… प्रचंड मळलं होतं, बारीक, हलकं झालं होतं …. पण खूष होतं … त्याला घरी नेलं … खायला दिलं, पाणी दिलं …. आनंदानी बागडत होतं, बसून माझ्याकडे बघत होतं … बडबड करत होतं …
त्याला म्हटलं आत्ता इथे थांब, आम्ही थोड्या वेळाने तुला घ्यायला येतो, म घरी जाऊ. आईच्या घरात त्याला ठेवून, कुलूप लावून मी पुन्हा हॉस्पिटलमध्ये गेले. तिथून मोकळी होऊन नंतर आम्ही चौघं त्याला आमच्या घरी घेऊन आलो… आधी पोटभर आवडीचं कॅटफूड खाल्लं. पाणी खूप प्यायलं … शांपू लावून स्वच्छ आंघोळ घातली, तर भरपूर ओरखाडे, जखमा दिसल्या… आंघोळीनंतर त्याने पुन्हा स्वतःला चाटून साफ केलं आणि गुरगुरत झोपलं… आज दिवसभर झोपून आता जरा बरं झालं आहे.
शर्मिला आपटे, यांनी “त्याला घरी यायचं आहे” आणि तो कुठे लपून बसला आहे याच्या वर्णनामुळे मला खरंच कमाल वाटली… हा कुठलातरी वेगळा अनुभव आहे, जो नास्तिक आणि rational thinker असल्यामुळे, मला मीच तो घ्यायची परवानगी देत नाहिये बहुदा… याचा अर्थ असा अजिबात नाही की मी अंधश्रद्धांना खतपाणी घालेन किंवा विचार न करता कुठल्या गोष्टींवर विश्वास ठेवेन… मी नक्कीच शास्त्रीय बैठकीवर जास्त विश्वास ठेवणारी आहे … पण या एका नव्या अनुभवाने, अनेक अनाकलनीय, आध्यात्मिक गोष्टी आपल्याला पुरेशा कळत नाहियेत असं वाटू लागलं… मांजर शोधणं खूप कठीण असतं …. त्यात अशी कधीही कल्पना न केलेली मदत मिळाली, त्याचं नवल वाटत राहतंय. शर्मिला आपटे वेगळीच भाषा बोलतात, त्यांचं खूप कौतुक. त्यांनी अनेकांना अशी मदत केली आहे यापूर्वी … अशीच मदत त्यांना करता येवो …
अपर्णाताई आणि शर्मिला आपटे याचे आभार. आमच्या शेजाऱ्यांची लेक दिशा आणि तिची आई, शिवाय नेहा आणि सोसायटीतल्या दोघी छोट्या मुली यांचेही आभार …
– आभा भागवत (शोभाताई बऱ्या आहेत, दोन दिवसांत घरी येतील. कोणीही चिंता करू नये आणि अजून प्रश्न विचारू नयेत… I am already drained out. Thanks.)